Friday, June 27, 2008

अपना आसमान

बिखरे हुए लब्जोंको जोड के तो देखो
बिच खडी दिवारोंको तोड के तो देखो
ये दुनिया बडी हसीन है मेरे दोस्त
प्यार भरी चादर ये ओढ के तो देखो

सिर्फ़ इटोंका घर बन नही सकता
बिना जोडे कण जूड नहीं सकता
घूल जाओ इस तरह एक दुजे मे
बिना प्यार के बल बढ नहीं सकता

मौका मिले तो जिवन की मंजील पा ले
साथ अपने पुरे जहान को बुला ले
हौसलों की उडान सदा उंची रखना
या अपना नया आसमान तू बना ले

--स्नेहा

Thursday, June 19, 2008

श्रावणसरी

काल मेघ बरसले त्या दिवशीसारखे,
झाकलेल्या स्मृतींवरचे उडून गेले बुरखे

अस्ताव्यस्त धावणा-या अश्वांना लगाम कसा घालू?
आठवणींच्या पावसाचे थेंब कुठवर मी झेलू?

दिस होता तो श्रावणसरींचा......

क्षणात मोरपीस फिरले,
क्षणात मेघगर्जना झाली,
नयनांनी कुजबूजले काही,
नयनांनी ऐकले काही

तळहातावरून ओघळला क्षण
मनवॄक्षावर पालवी फुटली
हिरवा कोंब रुजला प्रितीचा,
त्यावर प्रेमसरींची बरसात झाली

असे सरले कित्येक पावसाळे
प्रितवॄक्षाची फोफावली सावली,
तू असला नसलास तरी,
जगले पळ कित्येक त्या खाली

या श्रावणात मात्र...................

प्रितपालवी झडली सोबत विरून गेली आशा
श्वासाशिवाय काया अशी दुर्दैवी आहे दशा
दिसत नसले मी तरी लक्षात ठेव आता,
खूणावत आहेत तुला आकाशी गर्जणा-या रेषा

--स्नेहा

Monday, June 16, 2008

पाऊस

झुळूक घेऊन आली गारवा,
सोबत काळ्या मेघांचा तो थवा,
हळूच करितसे शिडकावा,
हवेत मृदगंधाचा ओलावा

सृष्टीस जडला हा छंद नवा,
कोणीतरी भिजवायास हवा,
संततधारेत स्वछंदी जीवा,
झोंबे नखशिखांत हा गारवा

ओलेते पंख लेऊन पक्षी थवा,
घेई वृक्ष-पर्णाआड विसावा,
लाजे पांघरून शालू हिरवा,
धरेच्या मुखावर रंग नवा

--स्नेहा

मैत्री कशी असावी...

मैत्री असावी...
साखरेसारखी शुभ्र, मधूर, गोडवा देणारी,
जिवनात विरघळणारी आणि अशी की जिवनाहून वेगळी न वाटणारी,
जिवन प्राशन केल्यावरही जिभेवर चव रेंगाळणारी,
प्रत्येक क्षणाचा आस्वाद वाढवणारी,
आनंदाच्या क्षणी तोंड गोड करणारी,
जराही उष्णता लागली तरी लगेच करपणारी

--स्नेहा

Saturday, May 24, 2008

तुझी त-हा

नसतानाही असण्याची तुझी त-हाच आगळी,
भुलले मी सख्या अशी..तुझी ओढ वेगळी

नसतोस ना तू पहाटेच्या गारव्यात..
तरी शिरशिरी कशी येते अंगात..

नी असतोस का तू पहाटेच्या लालीत..
भेटतोस निसर्गात..पाना-फुला-वेलीत...

तुच घोंघावतोस ना माझ्या कानी.....
वा-याच्या जोडीला तुझीच गाणी...

लपाछपी खेळताना गंमतच करतोस..
सापडतच नाहिस मला..का अस्सं छळतोस..

परवा ते फूलपाखरू परत हाती विसावलं
सोडून तुझे रंग बोटावर उगाचच स्थिरावलं.

जेव्हा येतात मेघ दाटून... पाऊस गर्दी करतो..
भिजवायला मला चिंब.. कोण सरीतून येतो..

निद्राधीन होताना.. थकून जरा पडताना...
कळतं मला डोक्यावरून मायेचा हात फिरताना..

अशा माझ्या वेड्या प्रश्नांना उत्तरं मिळत जातात..
जेव्हा कळतं.... तू नाही तुझ्या आठवणी मजसवे राहतात..

--स्नेहा

भांडी

माणसाचे पण असेच असते ना...
ह्या भांड्यांसारखं...
नविन असल्यावर भांडे मस्त चकचकीत..
एकदम आरश्याप्रमाणे पारदर्शी...
त्याच्यासमोर येणा-या प्रत्येकाला त्याची छबी दाखवणारे..
मग दाखवताना दिसेनात का कमतरता....
चेह-यातल्या,....अंतरंगातल्या..
त्या व्यक्तीला अवगत असलेल्या... काही अनावगत ....

जसजसं भांडं जुनं होतं.....
त्याच्यामधे बरंच अघळ-पघळ ठेवलं जातं....
कधी काही चमचमित ..कधी सात्विक...
कधी गोड, कधी तिखट.....
प्रत्येक दिवसागणिक भांड्याची चकाकी कमी होते...
आणि पारदर्शकता ही....
मग ते भांडंही लपतं .... पुसटश्या रंगाखाली....
आता मात्र ते पण घाबरतं..दाखवायला छबी..
शिकतं जगायला असेच उष्ट्या-खरकट्यात...

मग कधी काळ ही असा येतो की,
भांड्याला भिरकावलं जातं...पोक येई पर्यंत..
मलूल अश्या भांड्यावर घातले जातात,
हातोड्याचे घाव...पोक काढण्यासाठी...
अशावेळी.....कितीही घासलं तरी चकाकी येत नाही..
संपला ना रे काळ त्या भांड्याचा.. आता नष्ट व्हायच्या वाटेवर..

बघणार कोण त्याच्याकडे?......
लोकांनी नविन भांडी घेतली आहेत ना....

--स्नेहा