Thursday, September 13, 2007

आकाश-धरती मिलन

मेघदुत आला,निरोप आकाशाचा
अर्धांगिनी धरतीला, भेटण्या येण्याचा

हरखली, मोहरली, धरती, लाजली गाली
मधुर मिलनाच्या स्वप्नात गुंग झाली

सूर्य झाकोळला आकाशाचे आगमन
ग्रीष्मत्रस्त धरणीला पाऊसरुपी आलिंगन

थंड थेंबात मिळाला मायेचा गारवा
पसरला चहूकडे सुगंधाचा ओलावा

ल्यायला तिने शालू हिरवागर्द
नयनात लज्जा दडवण्याचा यत्न व्यर्थ

झुण झुण वाजती पैंजण झर्यांचे
किण किण नादात आवाज कंकणांचे

वाजला सनई चौघडा मिलन सोहळ्यात
पक्ष्यांच्या स्वरांनी जणू नाचले आसमंत

तालावर नाचे पिसारा फुलवून मोर
वाराही मदमस्त फिरतो चाहुओर

नवचैतन्य आले बरसता जलधारा
वीज कडाडली, नजर लावणार्‍यांना इशारा

सूर्यकिरणांनी बांधिले विविधरंगी तोरण
क्षितिजावर कुठेतरी आकाश-धरती मिलन

...स्नेहा

2 comments:

HAREKRISHNAJI said...

वा क्या बात है

prabhavati said...

छान कविता !