Monday, January 28, 2008

दृष्टीभ्रमातले तळे

दृष्टीभ्रमातले तळे

डोई ऊन तळपले,
लागे चटका जीवाला,
तन नाजुक पोळले,
वेडा जीव तो जळाला...

वृक्ष साऊली भासली,
जीव हर्षून गेला,
खुप शिणली पाउले,
जीव थकुन तो गेला...

येयी थंड झोत वारा,
जीव हरखुन गेला,
तेव्हा तरारले मन,
जीव सुखाऊन गेला...

होती वादळ चाहुल,
जीवास ना उमजले,
दृष्टीभ्रमच ठरला,
ऊन हातात उरले...

वावटळीत उडाली,
सारी नशिबाची पाने,
भोवताली धरे फ़ेर,
जीव पाहातो डोळ्याने...

कशी सापडेल वाट,
ही जीवाची घालमेल,
जेव्हा सरेल वादळ,
मार्ग तेव्हाच कळेल...

वादळाच्या शांततेत,
भासे मनाचा गोंधळ,
उन्मळे वृक्ष निवारा,
जीव एकटा केवळ...

सोडुन द्यावा का मार्ग?
का जावे जरासे पुढे,
तिथे भेटेल का पुन्हा,
दृष्टीभ्रमातले तळे?

--स्नेहा

No comments: