Monday, June 9, 2008

एक होती मुलगी

एक मुलगी होती. साधी भोळी थोडीशी बुळी. बुळी म्हणजे कोणात लगेच न मिसळणारी. थोडीशी वेंधळी वाटणारी,हुशार होती ती पण थोडा कमी आत्मविश्वास असलेली. कुठलीही गोष्ट आपण करू शकू की नाही ह्याबाबत सुरूवातीला बिचकणारी पण एकदा काहीही हाती घेतलं की तडक पुर्ततेला नेणारी.सावळी काया पण नाकी डोळी नीटस. डोळ्यात एक चमक होती तिच्या काहीतरी मिळवायची. जगाला काहीतरी करून दाखवायची. पण पुढे जाणार कशी.. जणू अबोली होती ती, एकदम गुलाबाच्या कळीसारखी न फ़ुललेली. पण फ़ुलण्याची स्वप्ने डोळ्यात घेऊन जगणारी. स्वप्नं पण किती विविधरंगी!! निसर्गात देखील एवढे रंग मिळणार नाहीत..पण ते तिच्या स्वप्नात , मनात आणि डोळ्यात भरलेले होते.

तिचे ही आयुष्य असेच साध्या मुलींसारखे होते. शिक्षण झाल्यावर नोकरीच्या शोधात निघाली आणि सोबत त्या स्वप्नांना ख-या जगात शोधायला निघाली. तिला वाटायचं की ती एक फ़ूलपाखरू आहे कोषात बंद असलेले. मोठ्या तो-यात असायची. सांगायची,एकदा बाहेर पडू दे मला या कोशातून. फ़ैलावू दे माझे पंख. लोक दिपून जातील माझे रंग पाहून. कोणीच मला पकडू शकणार नाही. मी उडेन अशी फूलाफूलांवरून.ती फूले पण किती आनंदी होतील मला पाहून. आपला मधूरस मला देतील हसत हसत. अशी एक ना दोन हजार स्वप्न होती तिची.शेवटी तिचा कोष तुटला आणि ती मोकळी झाली. उडायला पुर्ण आकाश होतं तिच्याकडे पण त्या एवल्याश्या फुलपाखराच्या पंखात त्या आकाशाला गवसणी घालण्याचं बळच नव्हतं. तिथेच तीचे पहिले स्वप्न मोडले. तिच्या स्वप्नांच्या जगात तिला कधी वाटलेच नाही की फुलपाखरू जरी मनमोहक वाटलं तरी ते खूप नाजूक असतं. कसे झेपावणार ते आकाशात. थोडेसे उडल्यावरच त्याच्या पंखातलं बळ संपतेय. ते विश्रांती घेतेय की तोच कोणीतरी पकडायला धावतेय. अगदी त्याच्या हातून निसटता निसटता ते बोटांचे ठसे पंखांवर आणि मनावर ठसवून उडावे. मदतीसाठी एखाद्या फूलाकडे जावे तर ते ही आपल्या पाकळ्यांमधे सामावून घेईना. तिला समजू लागले होते,कोणतेही फूल त्या फूलपाखराचे कोणीही नसते. त्याला एकट्यालाच रहावे लागते.

एकटेपणा.... स्वप्नाबाहेरच्या रखरखीत उन्हात प्रवास करता करता हा एकटेपणा तिला प्रकर्षाने जाणवत होता. एकटेपणा..... माझ्या स्वप्नात तर मी कधीच एकटी नव्हते. सतत माझ्यासोबत असायचा तो......आनंद... जगण्याचा आनंद..कुठे बरं हरवला तो? मला स्वप्नात म्हणाला होता बाई...तुझ्याबरोबर सावलीसारखा असेन मी. मग आता कुठे राहीला? का एक एक स्वप्न मोडत चाललेय तसा तो ही माझ्यापासून दुर चाललाय. नाही .. आहे ना तो.. पण किती बदललाय... मी ओळखलच नाही त्याला. आता जगण्याचा आनंद विकत घ्यावा लागतो.निखळ..निर्मळ असा तो राहीलाच नाही...

असा विचार करायला लागली की तिच्या मस्तकाची चिरफाड व्हायची. कुस्करलेल्या फ़ुलांप्रमाणे कोलमडून जायची. डोक्यातून जोरात जाणा-या ट्रेनचा भोंगा ऐकू यायचा. ती डोळे आणि कान गच्च मिटून घ्यायची आणि थोडावेळ का होईना या जगातल्या गोंगाटापासून अलिप्त व्हायची. जरा हायसे वाटायचं मग तिला. परत घरी आल्यासारखे.सगळी रंगित स्वप्नं तिच्याभोवती पिंगा घालायची. "राणी ग राणी, असा का ग धीर सोडतेस? आम्ही आहोत ना सोबतीला." तिचा गालावरची खळी अजुनच फ़ुलायची आणि त्या स्वप्नांना कवेत घेण्यासाठी हात फ़ैलावायची आणि काहीच हाती नाही आले तर हिरमुसायची.

मग मात्र तिला सवय झाली. अशा पोरकट स्वप्नांचा राग यायला लागला. मला किती गैरसमजात ठेवले या स्वप्नांनी. ती असतातच मोडण्यासाठी.या पुढे स्वप्न पहायची नाहीत असे ठरवलं तिने.अशा भावनांशी खेळ करूनही सत्यात न उतरणा-या स्वप्नांची तिला किव यायला लागली. आता ती जूनी उरली नव्हती. तो हळवेपणा जाऊन एक प्रकारचा यांत्रिकपणा येऊ लागला तिच्यात. तिच्या डोळ्यातल्या रंगांवर काळसर छटा येऊ लागली होती. तिने स्वत:ला मिळवता मिळवता स्वत:लाच गमवले होते.या जगाच्या बाजारात हरवली होती ती. ना उरली होती आकाशाची आस ना नाविन्याचा ध्यास.



का हो व्हावं असं तिच्यासवे..... तिने पहायलाच हवेत स्वप्न नवे नवे...

या रुसलेल्या तिला कोण मनवणार....तिच्या गालावरच्या खळीला कोण खुलवणार



खरं तर ती जगायचं असतं म्हणून जगत होती. ना हसत ना रडत.दिवस मावळत होते.रात्री सरत होत्या.

मग तो आला,तिला शोधत..स्वप्नांचा जादुगार होता तो. तिच्या सुंदर सुंदर स्वप्नांचा पाठ्लाग करत आला होता तो. सतत काही दिवसांपासून सतत मागावर होता तिच्या. पण त्याचा विश्वास बसेना हिच का ती? जिने एवढी सुंदर स्वप्ने रचली होती ती ही असेल त्याला खरे वाटत नव्हते.

इकडे तिला काही दिवसांपासून तिला स्वप्ने पडत होती आणि नेहमीच्या सवयीप्रमाणे ती दुर्लक्ष करत होती. पण आजकालची स्वप्ने जरा वेगळी होती.जितके त्यांच्यापासून दूर जावे तेवढी अधिकच जवळची वाटू लागत होती.

आणि तो ही आला होता......तिचा चांगला मित्र बनला होता. तिला कळत नव्हतं की त्याच्याबद्दल एवढं आपलेपण का बरं वाटावं. त्याने नेहमीच तिला प्रोत्साहन दिले होते. जिथे कमी पडेल तिथे मार्गदर्शन दिले होते. ती जगाला भिडायला तयार होत होती त्याच्या मदतीने. त्या फुलपाखराचा नाजूकपणा जाऊन एका पक्ष्याचे बळ येत होते तिच्यामधे...फक्त त्याच्यामुळे.एका कोमेजलेल्या झाडाला जसे खतपाणी द्यावे तसे तो तिला जपत होता. काय असं होतं दोघांमधे....मैत्रीच्या गाठीमधे बांधले गेले होते दोघे. एकमेकांना सांभाळून एकमेकांना साथ देत होते ते दोघे. ओळखलत का त्याला?.....आपला स्वप्नांचा जादुगारच होता तो.तिचे जिवन बदलत होते.त्याच्याबरोबर राहून तिला स्वप्नांचं महत्व कळत होतं. एका फ़ुलाप्रमाणे ती फूलत होती. स्वत:ला उलगडत होती.तिच्या व्यक्तीमत्वाला एक एक पैलू पडत होती.

पुन्हा परत पहिल्यासारखी.....नाही...पहिल्यासारखी नाही. आता आत्मविश्वास तिच्या नसानसात होता. कोणाच्याही रुपरेषेपेक्षा व्यक्तीमत्वाला महत्व असतं हे तिला कळलं होतं. तो घेऊन आला होता एक पहाट तिच्यासाठी. उगवत्या सुर्याबरोबर ती ही उगवत होती स्वत:चा प्रकाश घेऊन. स्वत:चे आकाश घेऊन. जमिनीवर पाय रोवून आभाळाला खाली खेचण्याची ताकद ती कमावत होती. स्वत: खूश रहात होती.आता मात्र लोक तिचा हेवा करत असत. तिची तारीफ करत आणि तिला आदर्श ही मानत कधी कधी. या बदलाने ती चक्रावली होती. त्याने तिला मग समजावले,"तुझ्या प्रगतीमूळे हे सगळे तुझ्याभोवती आहेत. नजरेला दिसतय त्याच्याही खोलात जाऊन पहात जा. नविन नाती जोडताना अंतरंग ही बघत जा." मग ती त्याला विचारायची,"तू तर आहेस ना माझ्याबरोबर मग तू मला मदत करशील ना?" तो हसून म्हणायचा,"मी आता आहे नंतर असेन की नाही.... माहीत नाही. तू मात्र अशीच रहा नेहमी." मग ती सुन्न व्हायची.. थोडासा अबोला धरायची आणि अगदीच करमलं नाही ना की मग त्याच्याशी परत जाऊन बोलायची.

मग एक दिवस आला.तो तिला म्हणाला ,"मी जातोय." ती व्याकूळ नजरेने त्याच्याकडे पहात म्हणाली,"का रे! माझ्याकडून काही चुकलं का?" "नाही पण मी तुला म्हणालो होतो की मी जाणार एक दिवस.पण अशीच स्वप्नं पहात रहा नवनवीन, देखणी आणि आनंदी रहा.मी इथेच तर आहे मनाने तुझ्याबरोबर प्रत्येक क्षणी." तिच्या डोळ्यातून टपकन अश्रू ओघळला.



आता तिचे काय होईल?.......परत पुन्हा दु:ख वाट्याला येईल...

मैत्रीची धागा ऊसवला जेव्हा....पुन्हा परत कोण गुंफून देईल?



घाबरू नका..पुन्हा तसे काही होणार नाही.तो स्वप्नांचा जादूगार जाताना तिला स्वप्नांच्या बदल्यात काय देऊन गेला माहीत आहे का?..........ते खळखळत हास्य.निरागस बाळासारखं. जाता जाता त्याने पसाभर रातराणीची शुभ्र, सुगंधी आठवणींची, शिकवणींची फूले तिच्या ओटीत ठेवली आहेत. त्याचा घमघमाट तिला कधीच दु:खी होऊ देणार नाही. ती अशीच रहणार आहे ..आनंदी, सुखासीन, स्वप्नाळू, हळवी..........

पहा तुमच्याही आजूबाजूला कोणीतरी स्वप्नांचा जादूगार असेल तुमची स्वप्न रंगवायला. शोध घेणार ना तुम्ही?

3 comments:

Anonymous said...

Chinu...I miss u.

स्नेहा---स्नेहासक्त said...

hi,

Thanks for your comment.

who is this chinu....?

Anonymous said...

:)
-Hemant