माणसाला माणसाशी जोडतात ही नाती
खरेच का माणसेही जपतात ही नाती ?
म्हटली तर क्लिष्ट, म्हटली तर सरळ,
अवघड की निर्मळ , असतात ही नाती ?
पाखरांचे घरटे, मन इथेच रमते ,
उब मायेची अशीच का देतात ही नाती ?
कधी रक्ताची नाती, नि कधी मनाची नाती
काळ वेळ नी अंतर जोडतात ही नाती
दवबिन्दु कोवळे, मन मेघात दाटले
जीवन वनराजी, बरसतात ही नाती
विण नात्यांची भारी, जणू कोळ्याचीच जाळी,
नाजूक की बळकट, असतात ही नाती?
हळूवार फुंकर, तप्त निखा-याची धग,
गारवा की उष्ण झोत, असतात ही नाती?
अपेक्षाचे ओझे आहे, नात्यांच्या खांद्यावर,
ओझ्याखाली दबून का तूटतात ही नाती ?
कधी अतूट बंधन, कधी वाटते बेडी,
रेशीम गाठी की कैद , भासतात ही नाती ?
रूप नात्यांचे भेसूर, सैतानाचे असुर,
कधी पाठीत खंजीर, खुपसतात ही नाती
जी मधापरि गोड, मधुमक्षिकेचा डंख,
वेदनेचे घर जणू, भासतात ही नाती
कशीही असली तरी आपलीच ही नाती
स्नेहबंधात गुंफून निखरतात ही नाती
--- स्नेहा
1 comment:
अप्रतिम कविता...
Post a Comment