Tuesday, July 8, 2008

चाकोरीबद्ध आयुष्य

चाकोरीबद्ध आयुष्य,
एका रेखीव चित्रासारखं,
नानाविध रंगांनी सजलेलं,
परंतु गडद किनारीमधे अडकलेलं,
ना बाहेर फ़िसकटण्याचं स्वातंत्र्य,
ना स्वत:चा रंग बदलण्याचं स्वातंत्र्य,


कधी माणसालाही जगावसं वाटतं,
त्या मॉडर्न आर्ट चित्रासारखं,
रंगात उधळलेलं किनारीची बंधनं तोडून,
या चित्रात डार्क लाईन्स फिकट पडत जातात आणि
रंग मिसळू लागतात एकमेकांत,
जो संगम मिळतो तीच त्या चित्राची रुपरेषा
सीमा असलेली तरी देखील बेबंद...

उतरत जावं सरसर या आयुष्याच्या कागदावर बिनबोभाट,
रंगांची किनार घेऊन खुलवावा आनंद,
खरं तर सगळं त्या चित्रकाराच्या हातात,
कसे रंग भरायचे हे तोच ठरवणार का?

नाही.... इथे चित्राला स्वातंत्र्य आहे,
चित्रकार म्हणतो...
शोध तुझा रंग आणि त्या रंगात रंगून जा,
चित्रकार देईल एक कॅनव्हास आणि कूंचले,
आणि हो त्याच्या विश्वात एका भिंतीवर
सुशोभित होण्याची संधी

खरंच नाही का...हे मारे आपण म्हणणार आम्ही स्वतंत्र,
पण त्या चित्रकाराच्या कॅनव्हास एवढेच....
आपले अस्तित्व जसे समुद्राच्या पाण्यातला एक थेंब.
पण एक लक्षात ठेवावं....
एकेक थेंब मिळूनच तो सागर बनतो...

कधी कधी या चित्रावर बसतात नशिबाचे आडवे तिडवे फटकारे...
तर कधी भरुन आल्यासारखं फिकट फिकट वाटत रहातं....
कधी लख्ख उजेड पडल्यासारखं स्वच्छ..
तर कधी मळभ दाटून आल्याप्रमाणे धूसर...

--स्नेहा

Friday, June 27, 2008

अपना आसमान

बिखरे हुए लब्जोंको जोड के तो देखो
बिच खडी दिवारोंको तोड के तो देखो
ये दुनिया बडी हसीन है मेरे दोस्त
प्यार भरी चादर ये ओढ के तो देखो

सिर्फ़ इटोंका घर बन नही सकता
बिना जोडे कण जूड नहीं सकता
घूल जाओ इस तरह एक दुजे मे
बिना प्यार के बल बढ नहीं सकता

मौका मिले तो जिवन की मंजील पा ले
साथ अपने पुरे जहान को बुला ले
हौसलों की उडान सदा उंची रखना
या अपना नया आसमान तू बना ले

--स्नेहा

Thursday, June 19, 2008

श्रावणसरी

काल मेघ बरसले त्या दिवशीसारखे,
झाकलेल्या स्मृतींवरचे उडून गेले बुरखे

अस्ताव्यस्त धावणा-या अश्वांना लगाम कसा घालू?
आठवणींच्या पावसाचे थेंब कुठवर मी झेलू?

दिस होता तो श्रावणसरींचा......

क्षणात मोरपीस फिरले,
क्षणात मेघगर्जना झाली,
नयनांनी कुजबूजले काही,
नयनांनी ऐकले काही

तळहातावरून ओघळला क्षण
मनवॄक्षावर पालवी फुटली
हिरवा कोंब रुजला प्रितीचा,
त्यावर प्रेमसरींची बरसात झाली

असे सरले कित्येक पावसाळे
प्रितवॄक्षाची फोफावली सावली,
तू असला नसलास तरी,
जगले पळ कित्येक त्या खाली

या श्रावणात मात्र...................

प्रितपालवी झडली सोबत विरून गेली आशा
श्वासाशिवाय काया अशी दुर्दैवी आहे दशा
दिसत नसले मी तरी लक्षात ठेव आता,
खूणावत आहेत तुला आकाशी गर्जणा-या रेषा

--स्नेहा

Monday, June 16, 2008

पाऊस

झुळूक घेऊन आली गारवा,
सोबत काळ्या मेघांचा तो थवा,
हळूच करितसे शिडकावा,
हवेत मृदगंधाचा ओलावा

सृष्टीस जडला हा छंद नवा,
कोणीतरी भिजवायास हवा,
संततधारेत स्वछंदी जीवा,
झोंबे नखशिखांत हा गारवा

ओलेते पंख लेऊन पक्षी थवा,
घेई वृक्ष-पर्णाआड विसावा,
लाजे पांघरून शालू हिरवा,
धरेच्या मुखावर रंग नवा

--स्नेहा

मैत्री कशी असावी...

मैत्री असावी...
साखरेसारखी शुभ्र, मधूर, गोडवा देणारी,
जिवनात विरघळणारी आणि अशी की जिवनाहून वेगळी न वाटणारी,
जिवन प्राशन केल्यावरही जिभेवर चव रेंगाळणारी,
प्रत्येक क्षणाचा आस्वाद वाढवणारी,
आनंदाच्या क्षणी तोंड गोड करणारी,
जराही उष्णता लागली तरी लगेच करपणारी

--स्नेहा