चाकोरीबद्ध आयुष्य,
एका रेखीव चित्रासारखं,
नानाविध रंगांनी सजलेलं,
परंतु गडद किनारीमधे अडकलेलं,
ना बाहेर फ़िसकटण्याचं स्वातंत्र्य,
ना स्वत:चा रंग बदलण्याचं स्वातंत्र्य,
कधी माणसालाही जगावसं वाटतं,
त्या मॉडर्न आर्ट चित्रासारखं,
रंगात उधळलेलं किनारीची बंधनं तोडून,
या चित्रात डार्क लाईन्स फिकट पडत जातात आणि
रंग मिसळू लागतात एकमेकांत,
जो संगम मिळतो तीच त्या चित्राची रुपरेषा
सीमा असलेली तरी देखील बेबंद...
उतरत जावं सरसर या आयुष्याच्या कागदावर बिनबोभाट,
रंगांची किनार घेऊन खुलवावा आनंद,
खरं तर सगळं त्या चित्रकाराच्या हातात,
कसे रंग भरायचे हे तोच ठरवणार का?
नाही.... इथे चित्राला स्वातंत्र्य आहे,
चित्रकार म्हणतो...
शोध तुझा रंग आणि त्या रंगात रंगून जा,
चित्रकार देईल एक कॅनव्हास आणि कूंचले,
आणि हो त्याच्या विश्वात एका भिंतीवर
सुशोभित होण्याची संधी
खरंच नाही का...हे मारे आपण म्हणणार आम्ही स्वतंत्र,
पण त्या चित्रकाराच्या कॅनव्हास एवढेच....
आपले अस्तित्व जसे समुद्राच्या पाण्यातला एक थेंब.
पण एक लक्षात ठेवावं....
एकेक थेंब मिळूनच तो सागर बनतो...
कधी कधी या चित्रावर बसतात नशिबाचे आडवे तिडवे फटकारे...
तर कधी भरुन आल्यासारखं फिकट फिकट वाटत रहातं....
कधी लख्ख उजेड पडल्यासारखं स्वच्छ..
तर कधी मळभ दाटून आल्याप्रमाणे धूसर...
--स्नेहा
No comments:
Post a Comment