Saturday, April 11, 2009

तन कोवळे फुलांचे कोमेजले उन्हाने

तन कोवळे फुलांचे कोमेजले उन्हाने
नाजूक त्या जीवाला असे जाळले उन्हाने

माझेच मैत्र माझ्या सवे फितूर झालेले
या सावलीस माझ्याच का जाळले उन्हाने

अजाणितेच घडले हे कसे अनाहूत
पावसांत देखील मज पोळले उन्हाने

शोधले कितीक वेळा माझ्याच अंतरंगी
माझ्याच अस्तित्वाला झाकोळले उन्हाने

हे असेच घडले गेली अनेक शतके
नारी स्वतंत्र झाली हे भासवले उन्हाने

-snehaa

स्वार्थी या जगात मज माणसे भेटलेली

स्वार्थी या जगात मज माणसे भेटलेली
रेशमी कपडयात तलवार लपेटलेली

करती गनिम कावा तुझ्यावरीच धावा
जळतील हात दोन्ही ती आग पेटलेली

त्यांची मधूर वाणी भुलशील तू लगेच
लागेल ठेच तरीही असशील गुंगलेली

होतील खूप जखमा खोल अंतरंगात
ना रक्ताचा टिपूस तरीही बधिरलेली

ती फसवी वचने तेच कडवे बहाणे
स्वार्थास पुजणारी अशी जात गांजलेली

--snehaa

Saturday, March 28, 2009

मैत्रीला सीमा नसतात...

मैत्रीला सीमा नसतात...
अंतराची बंधने नाहीत..
आहे फक्त एक ओलावा..
इथे विचारांची देवाण घेवाण होते..
भावनांना कंठ फुटतो..
हास्याची कारंजी उडतात....
अडचणींवर मार्ग सुचतात...
विसर पडतो रोजच्या विवंचनांचा....
तर कधी फक्त एक ऐकणारा मिळतो...
मग विचारांना व्यक्त व्हायला मिळतं..
मग ते उलट सुलट का असेनात...
हम्म.. कधी ओरडाही मिळतो चुकीच्या विचारांचा, वागण्याचा
आणि हे सगळे कसलीही अपेक्षा न ठेवता...
इच्छा फक्त एवढीच की ही मैत्री अशीच टिकुन राहावी...


--snehaa

अंगाई

चांदण्याच्या दुलईत
निजे शशी आभाळा,
मायेने मी जोजाविते
झोप माझे बाळा,

नको करू खोड्या
खिडकीत कोण आला,
वा-यासवे गात आला
फुलांचा झोपाळा,

झुलविते झुला
झोप डोळ्यांवरी येई,
स्वप्नांसवे निज
आई गातेय अंगाई


---Snehaa

Friday, March 20, 2009

काळ सरता सरता

काळ सरता सरता सारे विस्मरून जाते,
गप्पा गोष्टी मैत्री नाती सारे परकेच होते,
नाही कोणी रे थांबत पिण्या तुझे दु:ख सारे,
कशा फुका दवडीतो वेळ शोधण्या सहारे

सागरी या आयुष्याच्या तुझी नाव तू एकटा,
सद-यास हरेकाच्या खिसा असे रे फाटका,
किती साठव साठव सुख जाईल वाहून,
नको करु तू गमजा दु:ख बोचेल वाढून.

--snehaa

Sunday, February 22, 2009

फुलासारखी नाती जपावी लागतात.....

फुलासारखी नाती जपावी लागतात.....
मिटली ओंजळ तर कोमेजतात बिचारी....
म्हणून नात्यांना बंदिस्त करू नये..
खुलं सोडावं मोकळा श्वास घेण्यासाठी..
मग ती दरवळतात मनमोकळी...
आणि धूंद करून टाकतात

कधी आर्टीफीशियल नाती पाहीली आहेत का..
दिसतात ना वरून टवटवीत फुलं..
पण ती खोटीच ना....
सुगंधाचा फवारा मारून दरवळणारी..
फक्त टेबलाची शोभा वाढवणारी..
आयुष्याची शोभा वाढवणारी नाही..

जसजसा काही नात्यामधला वाढत जातॊ दुरावा ..
उरत नाही नात्यामधे काहीच ओलावा...
कधी काळी होता जो एक दुवा ....
पण आता..फक्त एक ओझं...
कदाचित जन्मभर खांद्यावर वागवण्यासाठी
सगळ्यांचीच फरफट..ओढाताण...
एक अयशस्वी प्रयत्न ... त्या नात्यात जिवंतपणा आणण्याचा

अशावेळी मग या रेशीमगाठी टोचतात..
प्रिय नात्यातूनच जखमा होतात...
या गाठी सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो..
पण कधी कधी या गाठी नाही सोडवता येत..
मग एकच उपाय..
तोडून टाकायची ती गाठ.. बस्स..
मग जपायचे ते निरर्थक तुटलेले धागे...
कुणास ठावूक का..कदाचीत माणुस असल्याची आठवण म्हणुन..

काय गंमत आहे ना....माणुस असल्याची देखिल जाणिव ठेवावी लागते.
नाहितर काही अमानवी नाती जन्मतात..
जी सुखाच्या ऐवजी दु:खच जास्त देतात..
जखडून ठेवणारी.... कैद भासणारी...
कधी पाठीत खंजीर खुपसणारी...

--स्नेहा

Sunday, February 8, 2009

चिमुरडी

(आजकाल लहान मूलांच्या शोषणाचा प्रश्न गंभीर झाला आहे.हे शोषण आज काल लहान मूलांच्या फ़ार जवळच्या विश्वासू व्यक्तींकडुन होत असतं. मुले या वयात खूप कोवळी असतात. त्यांच्यावर पालकांचे लक्ष हवे. आपली मुले कुठे जातात, तिथले लोक कसे आहेत? या कडे लक्ष देणे गरजेचे आहे. काही वेळेस त्यांना शोषण होतेय हेच समजत नाही. अशा वेळी मुलांना बोलते करणे आणि त्यांना योग्य आधार देणे महत्वाचे. अशावेळी काय पाऊले उचलावीत हे मला खरेच कोडे आहे. पण एक खरी गोष्ट इथे मांडत आहे.)

तिसरीतली ती चिमुरडी,बोलायची गुलू-गुलू,
हसायची ती निरागस,चिडायची हळूहळू,

दादाची होती मोठी लाडकी,
त्याच्याशी गटटी जमायची नेमकी

दादा आणायचा चॊकलेट मोठे,
कधी खेळायचा खेळ छोटे-मोठे

एकदा खेळताना हात पकडला चिमुरडीचा,
म्हणाला खेळ खेळू नवा चोर-पोलिसाचा

मी झडती घेताना तु जाम घाबरायचं,
मी काहीही केलं तरी नाही ओरडायचं

चिमुरडीला मग वाटू लागली भिती,
दादा असा वागायचा नाही कधी

मला जाउ दे म्हणु लागली चिमुरडी,
दादा म्हणाला मग खेळू पकडापकडी

चुरगाळलं ते बालपण त्याने भागवली तहान
एवढीशी चिमुरडी आता राहिली नाही लहान

दादामधे जागा झाला होता सैतान,
चिमुरडीला करुन दिली तिच्या स्त्रीत्वाची जाण

काळ सरला..

पण अजूनही ती घाबरते सगळ्या दादांना,
परत मिळेल का तिला हरवलेलं बालपण, सांगा ना?

न्हाऊन निघाली धरती

न्हाऊन निघाली धरती
हलकेच वाहला वारा
वर्षाव असा जलदांतुनी
सुखाच्या पडल्या धारा

नखशिखांत ती ओलेती
झेलती थेंब ओठांवर
भिजवाया तो ही आला
प्रेम झळके डोळ्यांवर

कर करांत मग मिसळोनी
किती गायली मंजुळ गाणी
भिजली एकमेकांसवे ती
दोन मने ती प्रेमदिवाणी

Wednesday, February 4, 2009

BallRoom Dancing......

त्या नाजूक संध्याप्रहरी
त्या मंजूळ संगीतलहरी
ते दोन गुंफले हात
ते दोन धूंदले श्वास

जीव सुरांवरी स्वार
गळी बाहुंचा हार
नयनात हरवले नयन
तालांवर डोले चरण

जग ह्या क्षणी थांबावे
अन पुन्हा न ते चालावे
ह्या क्षणांस कैद करावे
बाहूपाशात बंदिस्त व्हावे

--snehaa

Saturday, January 31, 2009

चित्र रेखीले एक घराचे

चित्र रेखीले एक घराचे
सुंदरसे ते होते माझे
रंग रंगुनी माझ्या रंगी
गोंडस दिसे ते घर माझे

चित्र रेखीव ते पुर्ण कराया
एक रंग तो कमी पडला
कारण ह्याचे उमजेना
मजपाशी तो रंग मिळेना

तगमग मनीची अशी
कोणी जाणावी कशी
शोधू लागले चहुकडे त्यास
जो देयील मज रंगछटा ती

हाती घेऊन त्याचा रंग
मनी जागला आशेचा तरंग
हाय माझे नशीबच खोटे
त्याचे सगळे फासे उलटे

माझे सुंदर चित्र नव्याने
घेतले रंगावया त्याने
रुपरेषा बदलली घराची
रंगले घर त्याच्याच रंगी

--sneha

रात

थंड की चादर लपेटे ना जाने यह रात कहां जा रही थी...
देख मुझे रास्तेमे, मुड गयी मेरी तरफ़..
रात के चेहरे पे, खिली थी मुस्कान...
माथे पे चांद की बिंदी सजाये, मुस्काये जा रही थी...
हवामे लहराते, काले घने बालोंमे तारे सजाये हुए थे....

कितने अपनेपनसे बातें कर रही थी ...
पुछा उसने...
कैसे जी लेते हो अपने थंडे दिल के साथ?
मै चौंक गयी.... थोडी हिम्मत जुटाके कहा
ना पिघलाओ इस दिल को.....
वापस उमड उठेंगे अधूरे अरमान..
कुछ बिखरे सपनें और कुछ दबी हुइ आहें...
शायद तुम समझ नहीं पाओगी इस दर्द को....

एक शिकनसी दिखी उसके चेहरे पे

ऐसे बातें करते करते...सुबह की आहट सुनाई दी..
और रात को अलविदा कहने का वक्त आ गया..

वोह तो चली गयी ... छोड गयी एक बात दिल मे...
कैसे जी पाती है वोह इस अकेलेपन के साथ?

काल फिर वापस उसकी राह देखने उसी रास्ते मैं चल पडी...
ना मिली वोह..ना ही उसकी आहट....
मैं निराश मन से वापस लौट आयी..

आज ना जाने क्युं ऐसा लग रहा है...
कहीं कोइ काली रात मेरे भीतर तो नहीं?

--sneha

Monday, January 26, 2009

आठवणी

आपल्याला मिळतात बरेचसे क्षण साठवून ठेवण्यासारखे,
साठवणीतली ही ठेवण, कधी कधी बनते एक अंगण...
हजार आठवणी येतात या अंगणात खेळायला ....
भलताच धुडगूस घालतात...जीव अगदी नक्कोसा करून टाकतात...
छळतातच जास्त.... शारिरीक अन मानसिक ही....
या आठवणींबरोबर खेळायला छान वाटतं...
मनाचं अवघं अंगणच बहरल्यागत भासतं..

कोणतीतरी आठवण मोठी द्वाड असते...
पट्कन हातातच येत नाही...पकडापकडीच चालु असते...
थोडीशी विस्माणात गेलेली... मग तिला हात खेचून अंगणात आणावं लागतं...
परंतु तिच्या येण्याने खेळाला नवा रंग चढतो...
मग ती एकटी येत नाही...सगेसोबती तिच्यासवे येतात...
आणि आपलेच होऊन जातात....

कुठली तरी आठवण खूप हसरी असते...
तिच्या शुभ्र कळ्यापाहून आपलं मन पण मोहरून निघते..
ती असते खूप जवळची ... असतेही सतत जवळ...
परंतू तिला हरवण्याची भिती साठुन राहीलेली असते..

काही आठवणी एका वा-यावर उडणा-या पंखाप्रमाणे
अलगद येतात अन हळुवार गुदगुल्या करून जातात...
या आठवणींचा मोठा मिस्किल स्वभाव...
येतात त्या छळायला जणू..... अशा येतात..मनात खोल शिरतात..
आणि चटकन वा-यावर स्वार होऊन उडूनही जातात....

काही आठवणी महा खोडसाळ...
अचानक येतात आणि ....
खेळताना कोणाला पाय घालून पाडावं ना..
त्या प्रमाणे आपल्याला जमीनीवर पाडतात...
कधी कधी तोंडघशी देखील पडतो आपण..
पण आठवणी आपल्याच नाहीत का...
त्यांच्यावर काय रागवायचं..
त्यांना आपल्यातलंच वागवायचं

काही आठवणी अगदी रडवेल्या....
त्यांना फार जपावं लागतं..
कधी कधी थोडं दूर देखील ठेवावं लागतं...
त्या मात्र स्वत:मधेच मग्न असतात..
असूनही नसल्यासारख्या भासतात..

कधी कधी या खेळाचा खुप कंटाळा ही येतो...
मग आपण या आठवणींना मनाच्या दरवाज्यामागे बंद करायचा प्रयत्न करतो...

पण....

या मनाच्या दरवाजांना कुलूप कुठे घालता येतं....



-स्नेहा

खामोशी

खामोशी करती है लाख सवाल , तेरी दोस्ती का है हमें ख़याल

चुकभुल द्यावी घ्यावी

धाडावा तुझ्याकडे, संदेश माझा कोणी
आठवणी अशा सदा, माझ्या मनाच्या अंगणी

वा-याला मी विनावी, सांग तिकडची खूशाली
जीव अधीर अधीर, काळजीने वर खाली
मोठा खोडकर वारा, अट त्याची असे भारी
म्हणे सांग मला निरोप, मी सांगेन त्या दारी
कसे त्याला मी सांगावे, शब्द का असती जरूरी
शब्दांपलिकडले त्याला, कसे उमगेल काही

रातीच्या चांदण्यात, शुभ्र उजळले आभाळ
चंद्रालाही घाली कोडे, माझ्या मनाचा गोंधळ
सांग मज तुझे कोडे, तुज हवे ते मी देतो
हसते मी विचारते.. सांग जीव कसा जडतो?
विचाराधीन शशीचे, डाग होतात गहरे
समजतील त्याला कधी, प्रितीचे प्रपंच सारे

चुकभुल द्यावी घ्यावी, अन अबोला सोडावा
माझा सखा मजला, पुन्हा नव्याने भेटावा
अलगद भरुन निघाव्या, सा-या मधल्या या द-या
अशी करते मी आशा, माझ्या इच्छा व्हाव्या पु-या
बस एकच मागणी, पुन्हा नको हा दुरावा
आपुल्यातला गोडवा, सा-या जन्मभर पुरावा

--स्नेहा

काय उरावं काय सरावं

काय उरावं काय सरावं
जिवनी आपुल्या काय स्थिरावं
याचा निर्णय आपुल्या हाती
कुणी जावं अन कुणी रहावं

उर फाटूनी माया दावी
दुनियेमधे असे मायावी
मिळती पुष्कळ एकेकाला
वाटे त्यांना.. माया(पैसा) द्यावी

प्रत्येकाचं मन राखावं
त्यासाठी जर मन मारावं
हिच असे जर रीत जगाची
तर मनापरी कधी जगावं

समजून उमजून कधी बोलावं
शब्दांना तोलून उलगडावं
दुखवू नये जर हर एकाला
परखड मत मग कधी मी द्यावं

विरोधातून जन्मली दुनिया
रोज़ दाखवी नवी किमया
घाला मन बुद्धीची सांगड
वेळ का घालवावा वाया

--स्नेहा