Monday, January 26, 2009

चुकभुल द्यावी घ्यावी

धाडावा तुझ्याकडे, संदेश माझा कोणी
आठवणी अशा सदा, माझ्या मनाच्या अंगणी

वा-याला मी विनावी, सांग तिकडची खूशाली
जीव अधीर अधीर, काळजीने वर खाली
मोठा खोडकर वारा, अट त्याची असे भारी
म्हणे सांग मला निरोप, मी सांगेन त्या दारी
कसे त्याला मी सांगावे, शब्द का असती जरूरी
शब्दांपलिकडले त्याला, कसे उमगेल काही

रातीच्या चांदण्यात, शुभ्र उजळले आभाळ
चंद्रालाही घाली कोडे, माझ्या मनाचा गोंधळ
सांग मज तुझे कोडे, तुज हवे ते मी देतो
हसते मी विचारते.. सांग जीव कसा जडतो?
विचाराधीन शशीचे, डाग होतात गहरे
समजतील त्याला कधी, प्रितीचे प्रपंच सारे

चुकभुल द्यावी घ्यावी, अन अबोला सोडावा
माझा सखा मजला, पुन्हा नव्याने भेटावा
अलगद भरुन निघाव्या, सा-या मधल्या या द-या
अशी करते मी आशा, माझ्या इच्छा व्हाव्या पु-या
बस एकच मागणी, पुन्हा नको हा दुरावा
आपुल्यातला गोडवा, सा-या जन्मभर पुरावा

--स्नेहा

No comments: