आपल्याला मिळतात बरेचसे क्षण साठवून ठेवण्यासारखे,
साठवणीतली ही ठेवण, कधी कधी बनते एक अंगण...
हजार आठवणी येतात या अंगणात खेळायला ....
भलताच धुडगूस घालतात...जीव अगदी नक्कोसा करून टाकतात...
छळतातच जास्त.... शारिरीक अन मानसिक ही....
या आठवणींबरोबर खेळायला छान वाटतं...
मनाचं अवघं अंगणच बहरल्यागत भासतं..
कोणतीतरी आठवण मोठी द्वाड असते...
पट्कन हातातच येत नाही...पकडापकडीच चालु असते...
थोडीशी विस्माणात गेलेली... मग तिला हात खेचून अंगणात आणावं लागतं...
परंतु तिच्या येण्याने खेळाला नवा रंग चढतो...
मग ती एकटी येत नाही...सगेसोबती तिच्यासवे येतात...
आणि आपलेच होऊन जातात....
कुठली तरी आठवण खूप हसरी असते...
तिच्या शुभ्र कळ्यापाहून आपलं मन पण मोहरून निघते..
ती असते खूप जवळची ... असतेही सतत जवळ...
परंतू तिला हरवण्याची भिती साठुन राहीलेली असते..
काही आठवणी एका वा-यावर उडणा-या पंखाप्रमाणे
अलगद येतात अन हळुवार गुदगुल्या करून जातात...
या आठवणींचा मोठा मिस्किल स्वभाव...
येतात त्या छळायला जणू..... अशा येतात..मनात खोल शिरतात..
आणि चटकन वा-यावर स्वार होऊन उडूनही जातात....
काही आठवणी महा खोडसाळ...
अचानक येतात आणि ....
खेळताना कोणाला पाय घालून पाडावं ना..
त्या प्रमाणे आपल्याला जमीनीवर पाडतात...
कधी कधी तोंडघशी देखील पडतो आपण..
पण आठवणी आपल्याच नाहीत का...
त्यांच्यावर काय रागवायचं..
त्यांना आपल्यातलंच वागवायचं
काही आठवणी अगदी रडवेल्या....
त्यांना फार जपावं लागतं..
कधी कधी थोडं दूर देखील ठेवावं लागतं...
त्या मात्र स्वत:मधेच मग्न असतात..
असूनही नसल्यासारख्या भासतात..
कधी कधी या खेळाचा खुप कंटाळा ही येतो...
मग आपण या आठवणींना मनाच्या दरवाज्यामागे बंद करायचा प्रयत्न करतो...
पण....
या मनाच्या दरवाजांना कुलूप कुठे घालता येतं....
-स्नेहा
No comments:
Post a Comment