Sunday, February 22, 2009

फुलासारखी नाती जपावी लागतात.....

फुलासारखी नाती जपावी लागतात.....
मिटली ओंजळ तर कोमेजतात बिचारी....
म्हणून नात्यांना बंदिस्त करू नये..
खुलं सोडावं मोकळा श्वास घेण्यासाठी..
मग ती दरवळतात मनमोकळी...
आणि धूंद करून टाकतात

कधी आर्टीफीशियल नाती पाहीली आहेत का..
दिसतात ना वरून टवटवीत फुलं..
पण ती खोटीच ना....
सुगंधाचा फवारा मारून दरवळणारी..
फक्त टेबलाची शोभा वाढवणारी..
आयुष्याची शोभा वाढवणारी नाही..

जसजसा काही नात्यामधला वाढत जातॊ दुरावा ..
उरत नाही नात्यामधे काहीच ओलावा...
कधी काळी होता जो एक दुवा ....
पण आता..फक्त एक ओझं...
कदाचित जन्मभर खांद्यावर वागवण्यासाठी
सगळ्यांचीच फरफट..ओढाताण...
एक अयशस्वी प्रयत्न ... त्या नात्यात जिवंतपणा आणण्याचा

अशावेळी मग या रेशीमगाठी टोचतात..
प्रिय नात्यातूनच जखमा होतात...
या गाठी सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो..
पण कधी कधी या गाठी नाही सोडवता येत..
मग एकच उपाय..
तोडून टाकायची ती गाठ.. बस्स..
मग जपायचे ते निरर्थक तुटलेले धागे...
कुणास ठावूक का..कदाचीत माणुस असल्याची आठवण म्हणुन..

काय गंमत आहे ना....माणुस असल्याची देखिल जाणिव ठेवावी लागते.
नाहितर काही अमानवी नाती जन्मतात..
जी सुखाच्या ऐवजी दु:खच जास्त देतात..
जखडून ठेवणारी.... कैद भासणारी...
कधी पाठीत खंजीर खुपसणारी...

--स्नेहा

No comments: