Saturday, September 29, 2007

काव्य

काव्य जिवन साधन
काव्य शब्द गुन्जन
काव्य तन मन धन
प्रत्येक कविचे

काव्यास वन्दन
काव्य एक बन्धन
काव्य एक दर्पण
जिवनचे

--- स्नेहा

ओढ.....

जशी..
लाटेला किनार्‍याची,
सूर्याला क्षितिजाची,
फुलपाखराला फुलाची,
चातकाला पावसाची,
तशी..
मला ओढ तुझी...

जशी नदी सागराकडे धाव घेते,
तसे मन धाव घेते,
तुला शोधून परत येते,

परत फिरून येऊन मन साद घालत आहे...
प्रत्येक आवाजात मला तुझाच का आभास आहे?

---स्नेहा

OOPS.......

तुझी माझी भेट प्रोग्रॅमिंगच्या तासाला
आपली गाठ जुळली OOPS च्या Concept ला

तुझे Encapsulation भारी, नाही बाहेरचा Interference
शोधले तुझे static function , पण लागला नाही Reference

दोघे आपण धावत राहू एकच Thread मधे
Garbage Collector ला ही बोलावू आपण मधे मधे

तुझे माझे Class Members अगदीच Different
properties ना match होत Situation आहे Current

Function आडवे आले तर घाबरू नकोस राणी
Overload करून टाकु आठवेल त्याला नानी

माझा object तुझा object एकमेकाविण अपूर्ण
Inheritance च्या संगतीने करू स्वप्न पूर्ण

आपल्या दोघांचे एक सुंदर package असेल
दोघांमधे आपल्या कोणताच Interface नसेल

बघ मी करून टाकतोय Classpath आपला Set
तुझी माझी होणार आहे या जन्मी नक्की भेट

आयुष्य आपले आपण Try Block मधे टाकू
अडचण काही आली तर Exception मधे फेकू

Catch Block मधे अडचणी Handle करू आपण
Finally मधे आयुष्य संपेल, मागे ठेऊन जाउ आठवण

--स्नेहा

नाती..........

माणसाला माणसाशी जोडतात ही नाती
खरेच का माणसेही जपतात ही नाती ?

म्हटली तर क्लिष्ट, म्हटली तर सरळ,
अवघड की निर्मळ , असतात ही नाती ?

पाखरांचे घरटे, मन इथेच रमते ,
उब मायेची अशीच का देतात ही नाती ?

कधी रक्ताची नाती, नि कधी मनाची नाती
काळ वेळ नी अंतर जोडतात ही नाती

दवबिन्दु कोवळे, मन मेघात दाटले
जीवन वनराजी, बरसतात ही नाती

विण नात्यांची भारी, जणू कोळ्याचीच जाळी,
नाजूक की बळकट, असतात ही नाती?

हळूवार फुंकर, तप्त निखा-याची धग,
गारवा की उष्ण झोत, असतात ही नाती?

अपेक्षाचे ओझे आहे, नात्यांच्या खांद्यावर,
ओझ्याखाली दबून का तूटतात ही नाती ?

कधी अतूट बंधन, कधी वाटते बेडी,
रेशीम गाठी की कैद , भासतात ही नाती ?

रूप नात्यांचे भेसूर, सैतानाचे असुर,
कधी पाठीत खंजीर, खुपसतात ही नाती

जी मधापरि गोड, मधुमक्षिकेचा डंख,
वेदनेचे घर जणू, भासतात ही नाती

कशीही असली तरी आपलीच ही नाती
स्नेहबंधात गुंफून निखरतात ही नाती

--- स्नेहा

तू खुले आकाश माझे, तू नवा विश्वास माझा

ओंजळ का कमी पडली ?...प्रेमजळ मावेना त्यात,
बुडाले त्या प्रेमजळात, कोंड्ला श्वास माझा

उमजले सगळे मला , वाटून गेले क्षणभर,
न समजणारे शब्द तुझे, बान्धिला मी कयास माझा

ओघाळला तो टपोरा अश्रू तुझ्या डोळ्यातला
बनेल केव्हा फूल त्याचे, हाच एक ध्यास माझा

काट्याकुट्याची वाट तुझी पाऊल जपून ठेव राजा
रूतला आठवणींचा काटा, तळमळला जीव काढण्यास माझा

बोल जे बोलले मी तेच जिव्हारी का लागले ?
खरेच होते ते, समजू नको हा विपर्यास माझा

*********************************************

ही इथे चौकट माझी, झेप माझी इथेपर्यंत
उघडेन हे दार मी, सम्पवेन हा बंदिवास माझा

सान्डत गेले पाऊलखुणा आयुष्याच्या वाटेवरती,
खुणा त्या पुसून गेल्या, खरेच?... की आभास माझा

परतिचा मार्ग हरवला, ना दिसे ध्येयाचे शिखर,
परंतु माझे मन सांगते,हीच वाट... हाच प्रवास माझा

दूर पुढे वळणावर आहे वृक्ष एक डवरलेला,
जाईन पुढे निडर मी, मानून गुरू त्यास माझा

गाठले जरी ध्येय शिखर, अजूनही कमीच आहे
कारण हे आयुष्या..
तू खुले आकाश माझे, तू नवा विश्वास माझा

***************************************
खोट्यान्च्या या गर्दीत ख-यांना शोधताना,
हरवले मी मनास, रामराम दुनियेस माझा

हात हाती, गुज ओठी, प्रेम गान गातो सदा
तृप्त मनी, सामावूनि, वाढवी तू उल्हास माझा

नेत्र सुखमय रक्तवर्णी गुलमोहर फुलला दारी,
पोळल्या देहास छाया, थंडावा डोळ्यांस माझ्या

संध्याकाळी नदीकाठी बसले होते आठवत,
दिसला डोह, तुझी नजर, जलाहुती देहास माझ्या

--- स्नेहा

Thursday, September 13, 2007

आकाश-धरती मिलन

मेघदुत आला,निरोप आकाशाचा
अर्धांगिनी धरतीला, भेटण्या येण्याचा

हरखली, मोहरली, धरती, लाजली गाली
मधुर मिलनाच्या स्वप्नात गुंग झाली

सूर्य झाकोळला आकाशाचे आगमन
ग्रीष्मत्रस्त धरणीला पाऊसरुपी आलिंगन

थंड थेंबात मिळाला मायेचा गारवा
पसरला चहूकडे सुगंधाचा ओलावा

ल्यायला तिने शालू हिरवागर्द
नयनात लज्जा दडवण्याचा यत्न व्यर्थ

झुण झुण वाजती पैंजण झर्यांचे
किण किण नादात आवाज कंकणांचे

वाजला सनई चौघडा मिलन सोहळ्यात
पक्ष्यांच्या स्वरांनी जणू नाचले आसमंत

तालावर नाचे पिसारा फुलवून मोर
वाराही मदमस्त फिरतो चाहुओर

नवचैतन्य आले बरसता जलधारा
वीज कडाडली, नजर लावणार्‍यांना इशारा

सूर्यकिरणांनी बांधिले विविधरंगी तोरण
क्षितिजावर कुठेतरी आकाश-धरती मिलन

...स्नेहा

रानफुल ते सुगंधी

ही कविता आहे तिच्यासाठी आणि त्याच्यासाठी....
काही समज गैरसमज आहेत....... दोघांतील अंतर त्यांच्या आयुष्याच्या वाटा वेगळे करू पाहत आहे.....
तात्पुरते पण धोकादायक आहे....... दोघांमधले अंतर....
अधीर मनाने वाट पाहणारी ती.......
द्विधा मनस्थिति तिची...
ही कविता एक दिलासा तिला.....
*****************************************

गेला निघून दूरदेशी,
झालिस तू वेडिपिशी

जमेना त्यास तुज वेळ देणे,
नेहमीचे तुझे हेच गा-हाणे

मार्गस्थ तो त्याचे लक्ष्य
आहे दृष्टिक्षेपात त्याच्या ,
ना साधासूधा, अडचणींचा मार्ग,
खाच खळगे रस्त्यात त्याच्या

प्रत्येक वळणावर एक मृगजळ
बोलावते त्याला.. नेईल दूरवर
फक्त तुझी साद,आणिते मार्गावर
तुझ्याचसाठी हा प्रवास खडतर

रानफुल ते सुगंधी, सुगंध तुझ्या प्रीतीचा
एकटे तरी सजीव, आधार तुझ्या आठवणींचा
साद देत राहा, परतीचा तो एकच सहारा
नाहीस तू तर.... फूल बिचारे,भरकटवेल वारा

...स्नेहा

सावर ती ओंजळ

ही कविता आहे त्याच्यासाठी आणि तिच्यासाठी....
काही समज गैरसमज आहेत....... दोघांतील अंतर त्यांच्या आयुष्याच्या वाटा वेगळे करू पाहत आहे.....
तात्पुरते पण धोकादायक आहे....... दोघांमधले अंतर....
जशी वाळू निसटाते ना हातातून तशी ती निसटतेय त्याच्या हातामधून ..निसरडी ती...
परंतु तिला पकडणारे हातही तेवढेच खंबीर असावेत........
******************************

निर्णय तुझाच आहे, वाळू निसटून जातेय ना
सावर ती ओंजळ, वाळू तुझीच तर आहे ना


पाहतेय ती वाट तुझी त्याच समुद्रकिनारी
जिथे सोडून तिजला गेलास तू भर दुपारी


वारा कुजबुजतो कानात तिच्या,
"झुलवीन पंखांवर फुलावाणी"
सागर गर्जत येतो म्हणतो,
"विशाल हृदयात सामावशील का राणी?"


भविष्याच्या चिंतेत होऊन जाते ती त्रस्त
तुझ्या वाटेवर डोळे ठेऊन बसते अस्वस्थ


हवे आहेत तिला फक्त तुझे दोन हात
बांधायचे आहे तिच्या वाळूचे घर साथ साथ


एकटी वाळू कशी बांधेल घर स्वत:चे?
पाहिजे तिला बळ तुझ्या हाताचे


घेऊन जा तिची वाळू दूर पहाडीवर
बांध तिचे घरटे त्या उंच टोकावर


भर हिवाळ्यात गार वारा, थंडी सरेल उबेवर
ऐन उन्हाळा तप्त, छत्र हातांचे धर तिजवर


दोन जीवांच्या या घरट्यात सुख शांती नान्देल
चिमण्यापाखरांच्या किलबिलाटाने घर पूर्ण वाटेल


पण तत्पूर्वी,
सावर ती ओंजळ, वाळू तुझीच तर आहे ना
निर्णय तुझाच आहे, वाळू निसटून जातेय ना


--स्नेहा

Friday, September 7, 2007

आयुष्यात खूप माणसे येतात जातात.......

आयुष्यात खूप माणसे येतात जातात.......

काही माणसे असतात मेंदी सारखी....
कोरा असतो हात ... ती अलगदपणे हातावर उतरतात,
त्यांची नाजूक नक्षी आणि तो मेन्दिचा धुंद करणारा सुगंधही आपल्या जीवनात घेऊन येतात...
खूप हरवून जातो आपण त्यांच्या रंगात ....रंगून जातो.....
आणि मग हळू हळू...तो रंग, तो वास फिकट होत जातो
आणि त्या माणसांचे अस्तितवही दूर होते आपल्या जीवनातून..
पुन्हा परत तो कोरा हात आणि मनात त्या रंग, सुगंध, नक्षीदार आठवणी.....


तर काही माणसे असतात, त्या तळ्यात पडणा- या दगडासारखी,
शांत पाण्यात खळबळाट माजवणारी.....
ती पाण्यात पडताच तरंगवर तरंग येतात जीवनात.....
अनपेक्षित रित्या येणारी ही माणसे..... ढवळून काढतात जीवन..
मग कधी खालचा गाळही वर येतो......... गढूळाता वर येते आपल्या जीवनातली....
आपण सावरेपर्यंत तो गाळ जगासमोर येतो आणि ही माणसे गायब होतात...
त्या तळातच खोल कुठेतरी..........


तर कधी काही माणसे असतात म्रुगजळासारखी ...
त्यांच्या मागे आपण धावत असतो........ ओढीने....
पण ती तर म्रुगजळच ना...... न हाती येणारी...
तरीही त्या तहानलेल्या जिवाला दुसरे काही दिसतच नाही..........
ते धावत असते फक्त शेवटी हेच जाणण्यासाठी की .... हा एक भासच होता....

अशीही माणसे असतात हवेसारखी......... सगळीकडुन व्यापलेले असतो आपण त्यानी ....
पण आपल्याला जाणीवच नसते....
.आपला श्वासोच्छवास चाललेला असतो त्यांच्यावर .....
अगदी निस्वार्थी पणे ती असतात सतत जवळ......... पण दिसत नाहीत दृष्टीला.......
नसतील ती....... तर जगणार कसे आपण?...... तरीही आपण विसरलेले असतो त्यानाच..........

अशीही माणसे असतात.....ज्यांच्यावर आपण पाय रोवून उभे असतो...
जशी ही धरणी........ भुमी.....गुरूत्वाकर्षण म्हणतात याला ......
पण अशा माणसांनी घट्ट पकडून ठेवलेले असते आपल्याला...
न धडपडण्यासाठी... आणि न भरकटण्यासाठी ................
आधारस्तंभ........... न ढळणारा.... तो दुवा..... जो जीवनाला आकार देतो.....
बदल्यात कधी मागतो...कधी नाही ....पण सतत असतो..... जवळच कुठेतरी.........


माणसांच्या या व्याख्या अपुर्‍या आहेत...........
मी ही कदाचित या पैकी कुठल्यातरी व्याख्येत बसत असेन कोणासाठीतरी....

...स्नेहा

लडिवाळ बोबडे बोल तुझे

लडिवाळ बोबडे बोल तुझे
करती मज बावरे
शोनुल्या लाडक्या माझ्या
कानास जसे संगीत भासे

दुडक्या चालीत तुझ्या
ताल सापाडे जीवास
ओढीत जेव्हा माझ्या
तू पळत येतोस

किती निरागस हास्य
निष्पाप जीव आहेस
धन्यता वाटते मज
तू माझे जीवन आहेस

ना राग सतत हास्य
ना हव्यास तू निर्व्याज
ना कावा तू निरागस
नजर ना लागो .. या बाळास

...स्नेहा

शब्दानाच गाणे सुचले आज

शब्दांनी दिली सुरास मात
आज कसे हे घडले खास
अरे वेड्या शब्दानाच गाणे सुचले आज

नाचले ते तालावर
घेऊन सुरांची साथ
अरे वेड्या शब्दानाच गाणे सुचले आज

एकमेकाविना अधुरे ते
शब्द-सूर जणू दिवा- वात
अरे वेड्या शब्दानाच गाणे सुचले आज

--स्नेहा (06/09/2007)

Wednesday, September 5, 2007

सुखाचा hangover

सुखाचा hangover आला आहे मला,
नाही बाहेर यायचे मला

पण कधीतरी उतरणारच ही नशा,
जेव्हा दुखची पहाट येईल,
माझे जीवन भानावर येईल,
आणि डोके बधिर होईल,

पण या Weekend Party साठी,
आठवडा तर जगणार ना,
त्या क्षणिक सुखसाठी,
दुखचे 100 क्षण भोगणार ना

-- स्नेहा

चावी

तुझ्या आठवणींचा कप्पा,

तुझ्या माझ्या गोड गप्पा,

तो सुना पडलेला कट्टा,

तू माझी केलेली थट्टा

बंद केले मनाच्या कपाटात,

चावी फेकली दूर समुद्रात

तू परत येऊन का वर्मावर घाव घालतोस ?

तुला कसे कळत नाही तू मला किती छळतोस,

कुठून आणलिस त्या कापटाची चावी,

तुला ते उघडायची परवानगी मी का द्यावी?

..स्नेहा

कारण.......तुझी आठवण

पाऊस पडला...... नयनातून
ढग गडगडला ...... हुंदक्यातून
वीज कडाडली....... मनातून
तळे साचले .... हृदयातून
कारण....... तुझी आठवण

ते गर्द धुके....पसरलेले
वाट तुझी मी......विसरलेले
आ S ह.... काटे रूतले... हृदयातले..
हरले जीवन....रक्ताळले
कारण.......तुझी आठवण

ती काळोखी रात्र.... उजाडता
तो निसतब्ध वारा... घोंघवता
ते कालचक्र...थांबता
असेच होते... तुला स्मरता
कारण.......तुझी आठवण

.. स्नेहा

ज़िंदगी

यही तो मज़ा है ,ज़िंदगी खेल खेलती है
ढूँढा जहाँ में , आख़िर पैरों तलेही मिलती है
...स्नेहा

आयुष्याची रेसिपी

फार अवघड नाही आहे साधी सोपी,
सांगते आज मी माझ्या आयुष्याची रेसिपी,

भात भाजी डाळ पोळी सगळे साग्रसंगीत आहे,
जिभेवर रेंगाळेल अशी नक्कीच चव आहे,

समाधानाची नरम पोळी ,सोबत नवनवीन स्वप्नांची भाजी
प्रामणिकतेचा उबदार भात, मायेपरि गोडी वारणाची,

फोडणी त्यावर आठवणींची, आशेच्या तूपाची धार,
सुखाचे मीठ पेरलेय, महत्वाचे आहे फार,

आंबट गोड नात्यांचे लोणचे, पाणी सुटतेय तोंडाला,
सोबत पापड ही आहे थोडीशी कुरकुर करायला,

काय म्हणता.?..मसाले ... ते कसे विसरेन मी,
राग,लोभ, तिरस्कार, मत्सर, थोडेच घालेन म्हणते मी,

रेसिपी संपली असे समजू नका, एवढ्यावर जेवण पूर्ण नाही,
दुखाच्या पाण्याचा ग्लास भरल्याशिवाय आयुष्याला अर्थ नाही,

रोज तृप्त होऊन अशीच मी जेवणार आहे,
पदार्थ कदाचित बदलतील पण ताट तेच राहणार आहे

----- स्नेहा

Saturday, September 1, 2007

स्वप्न

पहिले मी तुला माझ्या सोबत हसताना,
हातात हात घेऊन,आयुष्याच्या शपथा घेताना,
स्वप्न मोडले ..पाहिले स्वतःला सैरभैर होताना,
हात रिते तरीही .तुझा स्पर्श शोधताना
...स्नेहा