Saturday, September 29, 2007

तू खुले आकाश माझे, तू नवा विश्वास माझा

ओंजळ का कमी पडली ?...प्रेमजळ मावेना त्यात,
बुडाले त्या प्रेमजळात, कोंड्ला श्वास माझा

उमजले सगळे मला , वाटून गेले क्षणभर,
न समजणारे शब्द तुझे, बान्धिला मी कयास माझा

ओघाळला तो टपोरा अश्रू तुझ्या डोळ्यातला
बनेल केव्हा फूल त्याचे, हाच एक ध्यास माझा

काट्याकुट्याची वाट तुझी पाऊल जपून ठेव राजा
रूतला आठवणींचा काटा, तळमळला जीव काढण्यास माझा

बोल जे बोलले मी तेच जिव्हारी का लागले ?
खरेच होते ते, समजू नको हा विपर्यास माझा

*********************************************

ही इथे चौकट माझी, झेप माझी इथेपर्यंत
उघडेन हे दार मी, सम्पवेन हा बंदिवास माझा

सान्डत गेले पाऊलखुणा आयुष्याच्या वाटेवरती,
खुणा त्या पुसून गेल्या, खरेच?... की आभास माझा

परतिचा मार्ग हरवला, ना दिसे ध्येयाचे शिखर,
परंतु माझे मन सांगते,हीच वाट... हाच प्रवास माझा

दूर पुढे वळणावर आहे वृक्ष एक डवरलेला,
जाईन पुढे निडर मी, मानून गुरू त्यास माझा

गाठले जरी ध्येय शिखर, अजूनही कमीच आहे
कारण हे आयुष्या..
तू खुले आकाश माझे, तू नवा विश्वास माझा

***************************************
खोट्यान्च्या या गर्दीत ख-यांना शोधताना,
हरवले मी मनास, रामराम दुनियेस माझा

हात हाती, गुज ओठी, प्रेम गान गातो सदा
तृप्त मनी, सामावूनि, वाढवी तू उल्हास माझा

नेत्र सुखमय रक्तवर्णी गुलमोहर फुलला दारी,
पोळल्या देहास छाया, थंडावा डोळ्यांस माझ्या

संध्याकाळी नदीकाठी बसले होते आठवत,
दिसला डोह, तुझी नजर, जलाहुती देहास माझ्या

--- स्नेहा

No comments: