मी कोण ?
प्रत्येकाला हा प्रश्न कधी ना कधी पडतोच..
आज मला पण पडला..
मी तो सुर्य, तो चंद्र की ती पणती...
सुर्य म्हणजे स्वयंप्रकाशीत, स्वयंभु.....
ह्याच्या प्रकाशात सगळे उजळते..
हा झाकोळुन टाकतॊ सगळ्यांना..
ह्याच्याकडे उघड डोळ्यांनी पाहणे पण मुश्किल असते... नाही का?..
ना कोणी जवळ जाउ शकत...
त्याला सगळे नमन करतात ..पण त्याचा सखा होणे कोणासही शक्य नाही
त्याची संगत म्हणजे त्या झळा आणि एक झाकोळुन टाकणारे व्यक्तीमत्व..
मग कोण मी ?...तो चंद्र का...
तो शशी नेहमी सुर्याच्या प्रकाशावर अवलंबून
जरी वाटला शितल, शांत तरी...स्वयंप्रकाशासाठी परावलंबी...
हा देखील असे दूर गगनी ... त्या ता-यांना बिलगुनी...
का मी ती पणती...?
फ़क्त एकच ठिणगी..त्या पणतीला प्रज्वलित करायला पुरेशी..
त्या पणतीमधिल तेल म्हणजे ती धग..जी संपेपर्यंत पणती जगत असते..
जेव्हा मी जन्मले तेव्हाच ती पहिली ठिणगी मिळाली मला...
तेव्हा पासुन जळत आहे.....
आता ती धग संपेल तेव्हाच विझेन..
पण त्या दरम्यान खुप गोष्टी घडतील...
तो जोराचा वारा येउन विझवायचा यत्न करेल...
करु दे त्याला प्रयत्न .. हार मानणा-यातली मी नव्हे...
जरी लहान पणती ..तरी स्वयंप्रकाशित आहे..
उरी माझ्या प्रचंड तेज.. मी स्वावलंबी आहे...
अंधार दुर करण्याची शक्ती मी पण बाळगते..
मग मी नक्की ती पणती, ते तेल, ती वात , की ती ज्योत ...?
हम्म....कोणी ही नाही... मी फ़क्त तो प्रकाश
ती पणती, ते तेल, ती वात ,ती ज्योत ही फ़क्त जगाला अस्तित्व दाखवायची साधनं..
जसे हे शरीर ..नाही का ..?
मी त्या शरीरात वसणारी उर्जा .... त्या पणतीचा प्रकाश..
एक जोरदार वारा विझवेल ही कधी.... किंवा ते तेल संपेल..
मग मी नष्ट .....
जगातील प्रत्येक गोष्ट नष्ट होणारी आहे.....
मग का नष्ट होऊ नये थोडा उजेड देउन..
हो नक्किच मी ती पणती....
--स्नेहा
No comments:
Post a Comment