Wednesday, September 5, 2007

आयुष्याची रेसिपी

फार अवघड नाही आहे साधी सोपी,
सांगते आज मी माझ्या आयुष्याची रेसिपी,

भात भाजी डाळ पोळी सगळे साग्रसंगीत आहे,
जिभेवर रेंगाळेल अशी नक्कीच चव आहे,

समाधानाची नरम पोळी ,सोबत नवनवीन स्वप्नांची भाजी
प्रामणिकतेचा उबदार भात, मायेपरि गोडी वारणाची,

फोडणी त्यावर आठवणींची, आशेच्या तूपाची धार,
सुखाचे मीठ पेरलेय, महत्वाचे आहे फार,

आंबट गोड नात्यांचे लोणचे, पाणी सुटतेय तोंडाला,
सोबत पापड ही आहे थोडीशी कुरकुर करायला,

काय म्हणता.?..मसाले ... ते कसे विसरेन मी,
राग,लोभ, तिरस्कार, मत्सर, थोडेच घालेन म्हणते मी,

रेसिपी संपली असे समजू नका, एवढ्यावर जेवण पूर्ण नाही,
दुखाच्या पाण्याचा ग्लास भरल्याशिवाय आयुष्याला अर्थ नाही,

रोज तृप्त होऊन अशीच मी जेवणार आहे,
पदार्थ कदाचित बदलतील पण ताट तेच राहणार आहे

----- स्नेहा

1 comment:

trekker_nilesh said...

अतिशय सुंदर कविता आहे. मला खुपच आवडली आहे. अगदी नेमक्या शब्दात व्यक्त केले आहेस तू. छान आहे.
-- निलेश