Saturday, April 11, 2009

तन कोवळे फुलांचे कोमेजले उन्हाने

तन कोवळे फुलांचे कोमेजले उन्हाने
नाजूक त्या जीवाला असे जाळले उन्हाने

माझेच मैत्र माझ्या सवे फितूर झालेले
या सावलीस माझ्याच का जाळले उन्हाने

अजाणितेच घडले हे कसे अनाहूत
पावसांत देखील मज पोळले उन्हाने

शोधले कितीक वेळा माझ्याच अंतरंगी
माझ्याच अस्तित्वाला झाकोळले उन्हाने

हे असेच घडले गेली अनेक शतके
नारी स्वतंत्र झाली हे भासवले उन्हाने

-snehaa

स्वार्थी या जगात मज माणसे भेटलेली

स्वार्थी या जगात मज माणसे भेटलेली
रेशमी कपडयात तलवार लपेटलेली

करती गनिम कावा तुझ्यावरीच धावा
जळतील हात दोन्ही ती आग पेटलेली

त्यांची मधूर वाणी भुलशील तू लगेच
लागेल ठेच तरीही असशील गुंगलेली

होतील खूप जखमा खोल अंतरंगात
ना रक्ताचा टिपूस तरीही बधिरलेली

ती फसवी वचने तेच कडवे बहाणे
स्वार्थास पुजणारी अशी जात गांजलेली

--snehaa