निरोप
Tuesday, May 12, 2009
आज निरोप घ्यायचाय तुझा.......पण
तू आलाच होतास कधी निघून जायला..
तु यायचास आणि मला एक गिरकी देऊन जायचास
मी रमलेली स्वत: भोवती फिरत म्हणायचे..
दुनिया माझ्याबरोबर फिरतेय..
आणि कधी फिरायची थांबले की मग जाणवायचे ..
मी तिथेच आहे अजूनही...
पण तू कुठेतरी दूर गेलायस....
म्हणूनच कदाचित आता वाट पहायचा कंटाळा आलाय..
जाईन पुढे निघून..
मी जाईन पुढे निघून ..
पण माझे मन निघेल का.
ते चकव्यात अडकलंय...
कुठल्याही रस्त्याने जा..
परत परत इथेच फिरून येतेय..
वेडं असतं ना हे मन....
माझं ऐकत नाही आजकाल..
मी सुरात असले तरी ते बेताल..
सारखी लय सोडून पळणारं..
सतत तुझ्या वाटेवर डोळे ठेऊन बसणारं...
मनाला सगळं माहीती आहे..
ते हसणं, ते फुगणं, ती थट्टा मस्करी,
ते छेडणं, ते रडणं...
मनाला सुगंध येतो हरेक क्षणाचा,
मी मात्र दूर पळतेय,
परत मोहून गेले तर....
आता मी जाणार म्हणजे ते गजरे ही सुकणार
माझ्या शब्दफुलांचे.. जे विणले होते प्रेमाने
फक्त तुझ्याचसाठी..
सुकत चालले आहेत ते...
ते ही वाट पहात आहेत..
तू एकदातरी हुंगशील त्यांना..
त्यांचा सुगंध कळेल का तुला..
की साध्या गज-यांप्रमाणे चुरगाळून फेकून देशील...
जसं मला दूर केलंस....
आता नाही वाटत..
पुन्हा ही शब्दफूले जन्म घेऊ शकतील असे...
अन मी ही ....
--स्नेहा


